http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, December 26, 2020

136 BahujanNama Farmer 27Dec20 Daily Lokmanthan

बहुजननामा-136 ************** प्रा. श्रावण देवरे किसान आंदोलन व फुलेशाहूआंबेडकर!! -1- गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. बर्‍याच दिवसांपासून बहुजननामाचे वाचक मला या विषयावर लिहीण्याचा आग्रह करीत आहेत. परंतू जात्यंत+वर्गांत+स्त्रीदास्यअंताच्या लढ्यात कधीकधी काही काळासाठी जात्यंतचे लढे प्राधान्याने पुढ्यात येऊन ठाकतात तर कधी वर्गांताचे लढे! स्त्रीदास्यांताचे लढे फारच दुर्मिळ! आज महाराष्ट्रात अखिल भारतीय क्षत्रिय जातींच्या ओबीसीकरणाची नांदी ठरणारे मराठा आरक्षण जात्यंताच्या लढ्यातील एक महत्वपूर्ण ‘लढाई’ म्हणून पुढ्यात येऊन ठाकली असतांना, मी माझे लक्ष शेतकरी आंदेलनाकडे डायव्हर्ट करावं, हे मला पटत नव्हतं. आणी म्हणूनच मी या आंदोलनावर लिहीणं टाळत होतो. एक ना धड, भाराभर चिंध्या किंवा जॅक ऑफ ऑल आणी मास्टर ऑफ नथिंग, असा आमचा पिंड नाही. ‘‘जॅक ऑफ ऑल आणी मास्टर ऑफ ऑल’’ असण्यासाठी महापुरूषच असावे लागते! महापुरूष एकाचवेळी अनेक क्षेत्रात विविध पातळ्यांवर लढतात व यशस्वीही होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रस्त्यावरची लढाई डोकं फुटेपर्यंत लढत होते, त्याचवेळी ते मुकनायकाच्या कार्यालयात बसून ‘संपादकीय’ लिहित होते व त्याचवेळी ते लंडनच्या गोलमेज परिषदेत जाऊन गांधींसारख्या बलाढ्य शत्रूशीही लढत होते. लेखक, इतिहास-संशोधक, वकील, पत्रकार, आंदोलक, पक्ष-संस्थापक, आमदार, मंत्री, विचारक, तत्वज्ञानी, अर्थतज्ञ, घटनातज्ञ व घटनेचे शिल्पकारही त्यासोबतच कुटुंबात नवरा, बाप यासारख्या असंख्य जबाबदार्‍या लिलया पेलत जीवन जगणारे बाबासाहेब त्यामुळेच युगपुरूष ठरतात. त्यांच्या जीवनसंघर्षातील कुठले तरी एक क्षेत्र निवडावे आणी त्यातच गाडून घेऊन काम करीत राहावे, हे खर्‍या अनुयायाचे काम असते.
आदिवासी चळवळ व दलित चळवळीतून प्रशिक्षण घेऊन आम्ही विद्यार्थी दशेतच ओबीसी चळवळीत आलोत व आजतागायत 35 वर्षांच्या जीवन-काळात त्याच ओबीसी चळवळीत गाडून घेत संघर्षरत राहीलो आहोत. अनेक राजकीय पक्षांचे निवडणूकीचे प्रस्ताव ठोकरलेत, अमक्या तमक्या साहेबांशी जुळवून घेतले तर, तुमच्या अक्कल-हुशारीचे ‘चीज’ होईल, फलाण्या-वलाण्या नेत्याची ‘भेट’ घालून देतो, फायद्यात राहाल! अशा अनेक अमिषांवर मात करीत आम्ही जेथे होतो, तेथेच राहून संघर्षरत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! या विश्वासार्हतेपोटी आमच्या अनेक बहुजननामाच्या वाचकांना वाटते की, आम्ही शेतकरी आंदोलनावरही मार्गदर्शक असा बहुजनानामा लिहावा! -2- भारतातील कोणताही वर्गलढा वा वर्ग-संघटन हे जातीपासून मुक्त राहू शकत नाही. पॉझिटिव्ह मार्गाने तुम्ही या वर्ग-लढ्याचा ‘जात-संबंध’ स्वीकारला नाही, तर तो ‘जात-संबंध’ निगेटिव्ह बनून मागाच्या दाराने चळवळीत घुसतो व तुमचा वर्गलढा-वर्गसंघटन उध्वस्त करतो. वाईस-व्हर्सा हाच सिद्धांत दुसर्‍या बाजूने हेच सांगतो की, जर तुमचे जात्यंतक-संघटन व जात्यंतक लढा ‘वर्ग-संबंधां’पासुन लांब राहात असेल, तर तो निगेटिव्ह बनून तुमच्यात मागच्या दाराने घुसतो व तुमची जात्यंतक चळवळ उध्वस्त करतो. हा सिध्दांत पॉझिटिव्ह अर्थाने फुले+शाहू+आंबेडकर जगलेत, लढलेत व यशस्वी झालेत! स्त्री-शिक्षणाचा पुरूषी सत्तेविरुध्दचा लढा, शेतकर्‍यांचा सावकारशाहीविरुध्दचा लढा व कामगारांचा भांडवलशाहीविरुध्दचा लढा यांचा संबंध तात्यासाहेबांनी व त्यांच्या भालेकर-लोखंडे शिष्यांनी उघडपणे जातीनिर्मुलनाशी जोडला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून खोत टिळाकांनी सांगीतले की, स्त्रीयांना शाळेत आदर्श गृहिणीचे शिक्षण दिले पाहिजे व कामगार संघटना जातींचे ‘आदर्श गिल्ड’ बनले पाहिजेत. त्यावर कडी म्हणून 1894 साली न्या. रानडे जातीचा आर्थिक सिद्धांत मांडतात की, ‘‘ब्राह्मण वर्चस्वाच्या सामंती जातीव्यवस्थेतील ‘उधळ्या’ क्षत्रिय जातींची जागा, उगवत्या भांडवली अर्थव्यवस्थेत ‘काटकसरी’ वैश्य जाती घेतील व सत्ताधारी जात+वर्गाचे नवे समिकरण ब्राह्ण+वैश्य बनतील.’’ जमिनीवरचे मैदानी लढे योग्य तत्वज्ञान व अचूक धोरणांनी युक्त असतील तर आपला शत्रू ते लढे तत्वज्ञानाच्या पातळीवर कसे नेतो व कसे लढतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ‘जात+वर्ग+स्त्रीदास्यांताचे तत्वज्ञान ढोबळ स्वरूपात मांडून तात्यासाहेब महात्मा फुले व त्यांचे भालेकर-लोखंडेंसारखे शिष्य प्रत्यक्षात जगलेत. त्यानंतर या सिद्धांतांना अधिक सक्षम बनवित तात्यासाहेबांच्या मार्गावर शाहूराजे व बाबासाहेब आंबेडकर यांनी वाटचाल सुरू केली. शूद्रादिअतिशूद्रांना आरक्षण देतांना जातीचा निकष लावणारे शाहू राजे रशियाच्या ‘वर्गीय’ क्रांतीचे स्वागत करतात. जातीच्या आधारावर सामाजिक लढा देणारे बाबासाहेब, राजकारणात मात्र ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन करून वर्गांताच्या लढ्याशी असलेले नाते सिद्ध करतात. मात्र शूद्र-द्वेष्ट्या ब्राह्मणी कॉंग्रेसने व कामगार-द्वेष्ट्या साम्राज्यवादी इंग्रजांनी बाबासाहेबांना बळजबरीने शूद्ध जातीय राजकारणावर आणून उभे केले व बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील उगवता जात+वर्गलढा उध्वस्त केला. जात+वर्ग लढ्याचे क्रांतीकारक जीवन जगणारे 1944 पर्यंतचे बाबासाहेब व निव्वळ जातीलढ्यावर आलेले 1944 नंतरचे बाबासाहेब यांच्यात द्वंद निर्माण झाले व या द्वंदात प्रस्थापितांना फायदेशिर असलेले बाबासाहेब जिंकलेत. बाबासाहेबांचे सच्चे शिष्य असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी भुमिहिन शेतमजूरांचे देशव्यापी आंदोलन उभारून हा जात-वर्ग लढ्याचा संबंध पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला कारण तोपर्यंत जात-वर्गीय चळवळीत 1944 नंतरचे बाबासाहेब ठामपणे ‘आदर्श’ मानले गेले होते. त्यामुळे प्रस्थापितांची सरशी झाली. तात्यासाहेबांचे जात्यंतक वर्गलढे, शाहू महाराजांचे रशियन कामगार क्रांतीचे स्वागत व बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष या तीनही क्रांतीकारक घटना या देशातील दलित+ओबीसी+आदिवासी चळवळींनी कधीच स्वीकारल्या नाहीत. कम्युनिस्टांनी त्या स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांचा जन्मच मुळात या तीन क्रांतिकारक घटना दडपण्यासाठी झालेला आहे. कम्युनिस्टांनी उघडपणे टिळकांचा कामगार लढा ‘आदर्श’ मानला व रानडेंच्या जातीय अर्थशास्त्राप्रमाणे नव्या सत्तासमिकरणाचा संघ-आर.एस.एस.चा मार्ग खूला केला. -3- शेतकरी आंदोलन म्हटले की आमच्या लोकांना शरद जोशींची आठवण येते. शरद जोशींवर मी यापूर्वीही बरेच लिहीले आहे. जागतिक साम्राज्यवादी संस्थांनी शरद जोशींना भारतात शेतकरी नेते म्हणून ‘लॉंच’ केले, हे खरे
असले तरी भारतातील ब्राह्मणशाहीने त्यांना बिनविरोध कसे स्वीकारले, यावर फारशी चर्चा होत नाही. शरद जोशी लॉंच झालेत तो काळ मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीचाही होता, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या शेतकर्‍यांचे आंदोलन जोशीसाहेब उभे करणार होते, त्यात ओबीसी असलेल्या कुणबी-माळ्यांचे संख्यात्मक वर्चस्व होते व ते केव्हाही मंडल आयोग चळवळीत ‘उभे’ राहू शकतात, या भीतीपोटी शरद जोशींचा स्वीकार ‘एका अटीसह’ ब्राह्मणी सत्ताधार्‍यांनी त्वरीत केला. अट ही होती की शरद जोशींनी आरक्षणाला विरोध केला पाहिजे. ‘‘आरक्षण हे उष्ट्या पत्रावळीसाठी असलेले भांडण आहे’’ या जोशीबुवांच्या स्लोगणला भरपूर प्रसिद्धी दिली गेली. शरद जोशींच्या लॉंचिंगमागे दोन मुख्य उद्देश होते, डंकेल प्रस्तावाच्या खाऊजा धोरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांचे आंदोलन ‘वर्गीय’ होऊ नये व त्याचबरोबर मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय’ होऊ नये. शरद जोशींमुळे शेतकर्‍यांचे आंदोलन हे केवळ ‘शेतकर्‍यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा’ या एकमेव ‘आर्थिक’ मुद्द्याभोवती फिरत ठेवले गेले. या पार्श्वभूमीचा विचार करता आजचे दिल्लीतले शेतकरी आंदोलन नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार केला पाहिजे. केवळ रिलायन्सच्या अंबानी-अडाणीवर बहिष्कार टाकल्याने बाकीचे उर्वरित बनिया-ब्राह्मण भांडवलदार ‘पुरोगामी’ ठरत नाहीत व केवळ मोदिंना शिव्या देऊन संघ-आर.एस.एस.ला पाठीशी घालता येत नाही. किमान महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरी वारसा असलेल्यांनी तरी या दिशेने विचार करण्याची अपेक्षा होती. मात्र या सर्व वारसदारांनी 1944 पुर्वीचे बाबासाहेब ‘‘नाकारलेले’’ असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे मुर्खपणाचे ठरेल. शहानपणाच जेथे मुर्खपणाच्या नादी लागतो, तेथे नाईलाजाला ‘इलाज’ नसतोच! खर्‍या शहाणपणाचा ‘ईलाज’ सापडेपर्यंत सर्वांना जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!....... (लेखनः 26 डिसेंबर, प्रकाशनः 27डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/ Links for this article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/136-bahujannama-farmer-27dec20-daily.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/136-bahujannama-farmer-27dec20-daily.html

Saturday, December 19, 2020

135 BahujanNama Mahamarg 20 Dec 20

बहुजननामा-135 ************** प्रा. श्रावण देवरे ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा महामार्ग!! -1- गेल्या 2-3 वर्षांपासून ‘मराठा मराठा’ जप करणारे फडणवीस साहेब परवापासून अचानक ‘ओबीसी ओबीसी’ असा जप करू लागले आहेत. हे अचानक जप-बदलाचे कारण आपण सगळे जाणतोच आहोत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचे सर्व (ब्राह्मण+मराठा) उमेदवार निवडणूकीत सपशेल पडले व देवेन्द्रजी अचानक भानावर आलेत. ही किमया ओबीसींशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाहीत, हेही त्यांच्या लक्षात आले. ओबीसी बदलत आहे, याची त्यांना खात्री होते आहे.
आजवर सर्वच ब्राह्मण+क्षत्रिय जातींच्या मालकीचे पक्ष असे गृहीत धरून चालत होते की, ओबीसींना फक्त आश्वासन दिले की, काम भागते. ओबीसी जनगणना करण्याचे आश्वासन कॉंग्रेस व भाजपच्या अनेक केंद्रसरकारांनी पार्लमेंटसारख्या सर्वोच्च सभागृहात अनेकवेळा दिले आहे. मात्र जेव्हा जनगनना करणार्‍या डिपार्टमेंटचे अधिकारी जनगननेचा फॉर्म छापायला घेतात, तेव्हा प्रत्येकवेळी ते आपल्या मंत्र्यांना ओबीसी कॉलम टाकण्यासाठी विचारणा करतात. त्यावेळी हे मंत्री आपल्या अधिकार्‍यांना स्पष्टपणे सांगतात की, ‘‘मंत्री म्हणून मी पार्लमेंटमध्ये ओबीसी जनगणना करण्याचे आश्वासन दिलेले आहे. ओबीसींसाठी ‘आश्वासन’ हीच फार मोठी गोष्ट आहे. तेवढ्या एका आश्वासनावर ते आपल्याला भरघोस मत-‘दान’ करत असतील, तर प्रत्यक्ष ओबीसी जनगणना करण्याची गरजच काय?’’ फडणवीसांचाही असाच गैरसमज आतापर्यंत होता. 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या 15 दिवस आधी फडणवीसांनी धनगरांना 1000 करोड रूपये देण्याची घोषणा केली आणी धनगरांनी पडळकरांच्या भरवशावर आपली धनगर मते भाजपाला ‘दान’ करून टाकलीत. धनगरांना चौथ्यांदा मुर्ख बनविल्याबद्दल भाजपाने पडळकरांना आमदारकीची बक्षिसीही दिली. 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या 5 दिवस आधी फडणवीसांनी धोबी समाजाला एस्सी कॅटिगिरीत टाकण्याचे 4 ओळीचे पत्र दिले. बस्स! या चार ओळीच्या पत्रावर धोबी जात इतकी खूश झाली की, संपूर्ण धोबी जातीने बालाजी शिंदेंच्या भरवशावर भाजपाला मते ‘दान’ करून टाकलीत. एका-एका ओबीसी जातीला पकडून त्यांना मुर्ख बनविण्याचा धंदा हे प्रस्थापित पाच पक्ष वारंवार करीत असतात. ब्राह्मण+मराठा मालक असलेले कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे हे पाच पक्ष आलटून-पालटून ओबीसींना मुर्ख बनवित असतात व ते सत्तेवर येत असतात. मुर्ख बनविणारी ही फुसकी बंदूक कधी पडळकरांच्या खांद्यावर, तर कधी भुजबळांच्या खांद्यावर, कधी पंकजा-खडसे-धनंजयच्या खांद्यावर, तर कधी बालाजी शिंदे व म.जानकरांच्या खांद्यावर असते. आणी हे ढुसके ‘ओबीसी-लांडगे-नेते’ ढाण्या वाघाचं कातडं पांघरून पवार-फडणवीसांनी दिलेली फुसकी बंदूक आपल्या खांद्यावर घेतात व आपल्याच ओबीसी-जातबांधवांना मुर्ख बनवत असतात. ओबीसींच्या प्रत्येक जातीत असे ढुसके-लांडगे वाघाचे कातडे पांघरून ‘नेते’ बनलेले आहेत. हे लांडगे जोपर्यंत जीवंत आहेत, तो पर्यंत तुमच्या ओबीसीतला ‘सिंह-राजा’ कधीच जागृत होऊ शकत नाही. -2- मात्र पदवीधर+शिक्षक मतदारसंघातील निकालांनी फडणवीसांची झोप उडवली. आतापर्यंत संघ-भाजपाचे नेते ओबीसींना ‘हिंदू’ म्हणून हाक मारायचे. ओबीसींना ‘हिंदू’ म्हणून हाक मारली की, ओबीसी धावतच अयोध्येला जातात व बाबरी मशिद पाडतात. ओबीसींना हिंदू म्हणून हाक मारली की, लगेच मुस्लीमविरोधी दंगली पेटतात व संघ-भाजपा सत्तेत बसतो. मात्र परवा फडणवीसांनी आयुष्यात पहिल्यांदा ओबीसींना ‘ओबीसी’ म्हणून हाक मारली. भाजपाने आजवर कधीही ओबीसी सेलचा मेळावा घेतला नाही. मात्र परवा पहिल्यांदाच ओबीसी सेलचा मेळावा घेतला व त्यात फडनवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. भाषण कसले ते, सिंहगर्जनाच होती! ‘‘खबरदार! जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर!’’ –इति फडणवीस. फडणवीसांची ही सिंहगर्जना ऐकल्यानंतर उध्दवजींनाही चेव आला. ‘‘ओबीसींचे आरक्षण एका कणानेही कमी होणार नाही’’ –इति उध्दव ठाकरे. या दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला ‘धक्का’ लावण्याचे काम 29 नोव्हेंबर 2018 रोजीच करून टाकले आहे. तो केवळ धक्का नव्हता तर संवैधानिक नितीमत्तेला तो फार मोठा दाग-कलंक होता. त्यावेळी भाजपसेनेचे युती सरकार होते. या भाजप-सेना युती सरकारनेच मराठा-पक्षपाती गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींचा राज्यमागास आयोग नेमला. त्यात मराठा जातीयवादी-पक्षपाती सदस्य नियुक्त केलेत. मराठा जातीचे सर्व्हेक्षण मराठा जातीयवादी व्यक्तींकडून करवून घेतले. या खोट्या सर्व्हेक्षणाच्या आधारावर खोटा अहवाल तयार केला व त्यावर आधारित खोट्या शिफारशी करून ‘मराठा आरक्षण’ नावाचे अनैतिक अपत्य जन्माला घातले गेले. या पापात कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे हे पाचही पक्ष सहभागी आहेत. 29 नोव्हेंबर 2018 रोजी या सर्वच पाच पक्षांच्या आमदारांनी मराठ्यांचे ओबीसीकरण करणारे आरक्षण बील विधानसभेत बिनविरोध मंजूर करून या अनैतिक अपत्याला ‘अधिकृत’ अपत्य ठरवले. या अनैतिक अपत्याच्या गर्भार-काळापासूनच आम्ही त्याविरोधात आंदोलन केले. 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2018 या 15 दिवसात दोन ओबीसी मोर्चे व दोन धरणे आंदोलने आम्ही आझाद मैदानावर केलीत. त्यावेळी हे ढुसके ओबीसी नेते मराठा-ओबीसीकरण विधेयकाच्या बाजूने जल्लोषात मत-‘दान’ करीत होते. आता ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या वल्गना करून मोर्चे काढणारे हे ढुसके-ओबीसीनेते त्या ‘15 दिवासांच्या महत्वपूर्ण काळात’ बीळात घुसून लपून बसले होते. त्या 15 दिवसांच्या ‘थरार’ काळात या ओबीसी नेत्यांनी आम्हाला साथ दिली असती तर ‘मराठा-आरक्षण’ नावाचं हे अनैतिक अपत्य जन्मालाच आलं नसतं व ओबीसी आरक्षण आज धोक्यात आलं नसतं! -3- तीन पक्षांची मोट बांधून भाजपाला सत्तेबाहेर ठेवल्याने हे पक्ष पुरोगामी ठरत नाहीत. या सत्ताधारी पक्षांनी आतातरी तो गायकवाड आयोगाचा लपवून ठेवलेला अहवाल जगजाहिर करावा व त्यातील न्याय-विसंगतता व अनैतिकता विधानसभेत मांडून सुप्रिम कोर्टाला तसा अहवाल पाठवावा, तरच हे पक्ष पुरोगामी ठरू शकतात. परंतू हे होणे शक्य नाही, कारण या मविआ सरकारमधील तिनही पक्षांचे मालक ब्राह्मण+मराठे आहेत व त्यांच्या पक्षातील दलित+ओबीसी नेते त्यांचे नोकर-गुलाम आहेत! आता जे करायचे आहे ते ओबीसी मतदारांनीच करायचे आहे. त्याची सुरूवात पदवीधर+शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत झालेली आहे. परंतू ही सुरूवात गतिमान होऊन आपल्या ध्येयाप्रत गेली पाहिजे. केवळ भाजपाचे
मराठा+ब्राह्मण उमेदवार पाडून भागणार नाही, तर पुढील सर्वच निवडणूकात या पाचही पक्षांचे उमेदवार ‘चित’ केले पाहिजेत व त्यांचेजागी ओबीसी+दलित विचारवंतांनी पाठींबा दिलेले ‘अपक्ष’ उमेदवार निवडून दिले पाहिजेत. आज दलित+ओबीसींचा एकही पक्ष अस्तित्वात नाही, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र अशा ‘अपक्ष’ प्रयत्नातूनच ओबीसी+दलित+आदिवासी+कष्टकर्‍यांचा पक्ष ‘उभा’ राहू शकतो. ‘वरून’ कोणीतरी राजकीय पक्ष लादण्यापेक्षा आता जनतेतूनच पक्ष साकार झाला पाहिजे. परिस्थिती (नियती) तुम्हाला जातीअंताच्या दिशेने ढकलते आहे. या ढकल-गाडीचे रूपांतर बुलेट-ट्रेनमध्ये झाले पाहिजे. आपल्या जागृतीचे क्षेत्रही विस्तारले पाहिजे व वेगही वाढला पाहिजे. औरंगाबादच्या ज्या ओबीसी प्राध्यापकांनी दोन वर्षांपूर्वी माझ्या कडक भाषेवर नाराज होऊन बहिष्कार टाकला होता, त्याच प्राध्यापकांनी आज माझ्या आवाहनानुसार 53 हजार रूपये जमा केलेत व ओबीसी वकीलांना मदत म्हणून दिलेत. प्रा. वसंतराव हरकळ सरांनी याबाबत पुढाकार घेऊन हे क्रांतिकारक कार्य घडवून आणले. त्यांचे अभिनंदन! वैचारिक जागृती ही केवळ व्हाटसप+फेसबुक पर्यंत मर्यादित राहू नये, वैचारिक जागृती ही ‘तनमनधनात’ रूपांतर होऊन ठोस राजकीय पर्यायापर्यंत पोहोचली पाहिजे. आजची सर्व न्यायालये ही राजकीय-गुलाम झालेली आहेत. या न्यायालयांकडून तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर तुमच्याजवळ राजकीय ताकदही हवी! त्यासाठी ओबीसी+दलित मतदारांनी पुढील निवडणूकांमध्ये कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे या पाचही पक्षांचे उमेदवार पराभूत केले पाहिजेत व सच्चे फुलेशाहूआंबेडकरवादी ‘अपक्ष’ उमेदवार निवडून आणले पाहिजेत. अशा पद्धतीने 5-10 अपक्ष उमेदवार निवडून आणलेत तर, फडणवीस स्वतःच दिल्लीकडे धाव घेतील व सुप्रिम कोर्टाला सांगून ‘मराठा आरक्षण’ रद्द करवून आणतील! ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा हाच एकमेव ‘महामार्ग’ आहे. हे स्वप्न साकार होईपर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!....... (लेखनः 18-19 डिसेंबर, प्रकाशनः 20डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/135-bahujannama-mahamarg-20-dec-20.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/135-bahujannama-mahamarg-20-dec-20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

Saturday, December 12, 2020

134 BahujanNama Obc Bachav 13Dec20 Lokmanthan

बहुजननामा-134 ************** प्रा. श्रावण देवरे ओबीसी आरक्षण बचाव! आता नाही, तर कधीच नाही!! -1- मराठा आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन ज्या तत्परतेने व लगबगीने कामाला लागले आहेत, त्यामागची त्यांची तडफड आम्ही समजू शकतो! त्यासाठी तनमनासह धनाच्या राशी मोठ्याप्रमाणात खर्च होत आहेत, वकीलांच्या फौजा रणांगणात उतरविल्या जात आहेत व त्यांना लढण्यासाठी सर्वप्रकारची रसद शासनातर्फे पुरविली जात आहे. याबद्दल आनंदच आहे. फक्त दुःख एवढेच आहे की, ओबीसी आरक्षणसुद्धा मराठा आरक्षणाप्रमाणे शासनाचेच अपत्य आहे, याचा सोयिस्कर विसर महाराष्ट्र शासनाला पडलेला आहे. मराठा आरक्षण वाचवितांना ओबीसी आरक्षण धोक्यात येत आहे, याची पुसटशी जाणीवसुद्धा महाराष्ट्र सरकारला नाही. ओबीसी आरक्षणावर येऊ घातलेला घाला रोखण्यासाठी ज्यांनी न्यायालयात पिटिशन्स दाखल केलेल्या आहेत व त्यांच्यामार्फत जे वकील कोर्टात लढत आहेत, त्यांची साधी दखलही सरकार घ्यायला तयार नाही.
ओबीसी आरक्षण, त्यांचे पिटिशनर्स व वकीलांना सरकारकडून मिळणारी उपेक्षेची वागणूक व मराठा आरक्षणवाल्यांचे सुरू असलेले एकतर्फी लाड यामागे काय कारणे आहेत? एखाद्या समाजाचे शासकिय लाड करणे याला शासकीय पर्यायवाची शब्द आहे- विशेष उपाययोजना करून त्या समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबविणे. तसेच एकाद्या समाजघटकाच्या चूका पोटात घालून त्यांची सतत भलावण करीत राहणे, हे सुद्धा दुसर्‍या प्रकारचे शासकीय लाड समजले जातात. हे जे दुसर्‍या प्रकारचे शासकीय लाड आहेत, ते मुसलमानांच्या संदर्भात सांगीतले गेले आहेत. बहुपत्नीक विवाह, बहुअपत्यक कुटुंब, तोंडी तलाक पद्धती, पडदापद्धती वगैरे अशा अनेक चूका पोटात घालून शासन मुसलमानांची भलावण करीत असते व आपले (स्युडो) सेक्युलॅरिझमचे धोरण जनतेवर लादत असते. यामागे बोटबँकचे गणित असते, असाही आरोप यापूर्वी होतच होता. परंतू शासनाने कधीही मुसलमानांसाठी विशेष आर्थिक उपाययोजना आखून त्यांच्या विकासाचे कार्य केले नाही. बस्स! मुसलमानांच्या अनिष्ट चालिरितींना व त्यांच्या ऑर्थोडॉक्स आयडेंटीला मान्यता व संरक्षण दिले की ही धार्मिक वोटबँक सहज पदरात पडत असते, त्यामुळे मुसलमानांसाठी सरकारी तिजोरी खोलण्याची गरज नसते. हा कॉंग्रेसी लाडाचा मुसलमानीय तमाशा आपण 70 वर्षांपासून पाहात आलो आहोत व तो समजूनही घेतो आहोत. परंतु अलिकडे मराठा जातीचे जे शासकीय लाड सुरू आहेत, ते कोणताही सूज्ञ माणूस समजून घेऊ शकत नाही व तर्काच्या आधारावर ते कोणाला पटणारेही नाहीत. कारण ‘‘मराठ-लाड’’ हे प्रकरणच सर्वसामान्यांच्यादृष्टिने अनाकलनीय आहे. मराठ-लाड प्रकरणात दोन्ही प्रकारचे लाड येतात. 70 वर्षांच्या सत्ता-काळात त्यांनी स्वतःचे खूप वेगवेगळे लाड करून घेतलेत. सहकार-लाड, सामंती-लाड असे असंख्य लाड जनता आजही उघड्या डोळ्याने पाहात असते. जनतेने गल्लीतल्या निवडणूकीत ज्यांचे ‘डिपॉझिट’ जप्त केले आहे, अशा सामंतांना ‘राजे’ म्हणण्याचा आग्रह धरणे, हा सुद्धा लाडाचाच एक भाग आहे. त्यात आता आरक्षण-लाडाची भर पडलेली आहे. जे मराठा-आरक्षण सात आयोगांनी व हायकोर्ट सुप्रिम कोर्टांनी वारंवार फेटाळून लावले आहे, ते आरक्षण मिळविण्यासाठी शेवटी पेशवा षडयंत्र वापरावे लागले आहे, याचा सोयिस्कर विसर सर्वांना पडलेला आहे. मराठा जातीचे वर्चस्व असलेला गायकवाड आयोग नेमणे, मराठ्यांच्या तात्परत्या संशोधनसंस्था स्थापन करून त्यांच्याच कडून मराठा-सर्व्हेक्षण करून घेणे, खोटे सर्व्हेक्षण व खोटे रिपोर्ट तयार करून मराठा आरक्षणाची शिफारस करणे, हायकोर्टात जाणीवपूर्वक मराठा वकील व मराठा जातीचा न्यायधिश नेमणे व जातीच्याच लोकांकडून मराठा आरक्षण मंजूर करवून घेणे, याला पेशवा-षडयंत्र म्हणतात. विचार करा की जर आज सुप्रिम कोर्टात एकादा मराठा न्यायधिश असता तर, त्याने सर्व नितीमत्ता गहाण टाकून मराठा आरक्षण मंजूर करून टाकले असते. हेच नितीमत्ता गहाण टाकण्याचे काम गायकवाड-मोरे या मराठा न्यायधिशांनी मुंबई हायकोर्टात केले व त्यांना साथ इतर मराठा वकीलांनी केली. ओबीसी वकीलांना बोलूही दिले नाही व त्यांचे निवेदन रजिस्टरही केले नाही. मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठा-आरक्षण एकतर्फी जजमेंट(?) देऊन बळकावून घेतले आहे. याला पेशवा षडयंत्र म्हणायचे कारण हे आहे की, या न्यायालयीन नवटंकीचे मार्गदर्शक, संचालाक व नियंत्रक सर्वेसर्वा पेशवा-फडणवीस होते व आहेत. पेशवा-ब्राह्मण व सामंती-मराठा या सर्वांची मराठा आरक्षणासाठीची उठाठेव खरीखूरी प्रामाणिक असती, तर दलित-ओबीसींना त्याबद्दल काही आक्षेप असण्याचे कारण नव्हते व आजही आमचा कोणाचाच आक्षेप नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या आड लपून ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचे यांचे षडयंत्र आज नागडे-उघडे झालेले आहे. जे लोक आधी ‘‘ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता’’ मराठा-आरक्षण देण्याचे समर्थन करीत होते, तेच नालायक लोक आता उच्चरवाने ‘‘मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण पाहिजे’’ म्हणून बोंबलत सुटले आहेत. 20 वर्षांपूर्वी फक्त मोघमपणे ‘मराठा आरक्षण’ शब्दाचा उगम झाला. त्याला ओबीसींनी ठाम व ठोस दिशा दिली आणी सशर्त पाठींबाही दिला. ओबीसींची शर्त ही होती की, ‘आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा तोडण्यासाठी मराठ्यांनी आंदोलन केले पाहिजे.’ ‘दलित-ओबीसींच्या आरक्षणविरोधात दंगली घडवून आणणारे सामंती-मराठा आता स्वतःच आरक्षण मागत आहेत’, एवढ्या एका बातमीनेच बामसेफी खूश झालेत व बिनशर्त पाठींबा देऊन आंदोलनात सहभागीही झालेत. मराठा-आरक्षण मिळाल्यावर सामंती-मराठा हे फुले-आंबेडकरवादी बनतील व संघ-भाजपाच्या विरोधात लढतील, अशी ‘अनाभ्यासू’ भाबडी अपेक्षा बामसेफींना होती. ही धारणा आंबेडकरवादाच्या विरोधात असल्याने ती खोटीच ठरणार होती व ती खोटी ठरलीच! 2015-16 साली मराठा सेवा संघाच्या स्टेज-मागे मराठा आरक्षणाचा कृती-कार्यक्रम ठरवितांना गडकरी-फडणवीसांना विश्वासात घेतले गेले, बामसेफींना नाही. ओबीसींना 1993 साली आरक्षण मिळताच ओबीसींच्या स्वतंत्र पक्ष-संघटना स्थापन झाल्यात व त्यांनी संघ-भाजपाच्या विरोधातील लढा तीव्र केला. मराठ्यांना 2018 साली आरक्षण मिळताच सगळे सामंती राजे-महाराजे भाजपमध्ये गेलेत व संघ-भाजपाचे दलित-ओबीसीविरोधी मनुवादी राजकारण भक्कम करू लागलेत. ओबीसी आरक्षण हे फुले-आंबेडकरवादाच्या तत्त्वानुसार संवैधानिक आहे व मराठा आरक्षण हे वैदिक धर्मानुसार मनुस्मृत्यैक आहे, हे समजण्यासाठी आंबेडकरवादाचा सुक्ष्म अभ्यास करावा लागतो, हे सत्य बुद्धिस्ट-बामसेफींना ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी ते धन्य होतील. मराठा आरक्षण हे मनुस्मृत्यैक कसे? मनुस्मृती स्पष्टपणे सांगते की, राजकीय सत्ता ही क्षत्रियांच्याच ताब्यात राहीली पाहिजे. जेव्हा जेव्हा क्षत्रियांना सत्तेचा माज चढतो, तेव्हा तेव्हा अवतार घेऊन विष्णू-ब्राह्मण ही सत्ता आपल्या ताब्यात घेतो. मात्र दलित-ओबीसी आरक्षणामुळे क्षत्रियांच्या हातून सत्ता निसटत चालली आहे व ती शूद्रादिअतिशूद्रांच्या हातात जात आहे, हे पाहून सर्वात जास्त पित्त खवळले ते वैदिक- पेशव्यांचे! हा मनुस्मृतीचा घोर अपमान आहे, असे समजून ते कामाला लागले व शेवटी मराठा आरक्षण साकार केलेच! मनुस्मृतीच्या संहितेतून साकार झालेले मराठा आरक्षण आधी ओबीसीवर घाला घालणार व नंतर दलित-आदिवासींच्या आरक्षणावर! ही काळ्या दगडावरची रेघ समजावी! आज गावपातळीवरचा ओबीसी आपले संवैधानिक आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. अगदी विद्यार्थी, तरूण, तरूणी, म्हातारे जागृत झाले असून तेली, माळी, बारा बलुतेदार, भटके-विमुक्तांपर्यंतच्या ओबीसी जाती संघटित होत आहेत व आपले आरक्षण वाचविण्यासाठी आक्रोश करीत आहेत. ना शासनाचा पाठींबा, ना स्वजातीतील धनदांडग्यांचा पाठींबा! 1992 पर्यंत ओबीसी चळवळी करून ज्यांनी मंडल आयोग लागू करवून घेतला, त्यांच्यापैकी आज कोणीही ‘लाभार्थी’ नाहीत. मंडल आयोग लागू झाल्यानंतर अनेक लाभार्थी अचानक ओबीसी नेता म्हणून पुढे आलेत व त्यांनी अब्जावधी रूपयांची ‘माया’ कमावली. ओबीसी आरक्षण धोक्यात असतांना हे लबाड लाभार्थी नेते खिशात हात घालून पैसे काढीत नाहीत. सत्तेत आहेत, मंत्री आहेत, पण शासनाकडून काही मदत मिळाली पाहिजे, यासाठी कधी थोबाड उचकटत नाहीत. फक्त समित्या-उपसमित्या स्थापन करून ओबीसी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यापलिकडे यांना काहीही माहीत नाही. मराठा वकीलांप्रमाणे ओबीसी वकीलांनासुद्धा शासकिय मदत मिळाली पाहिजे, असा साधा उल्लेखही हे ओबीसी मंत्री आपल्या उपसमितीच्या अहवालात करीत नाहीत. प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे की, ओबीसी नेत्यांना फक्त आश्वासन दिले तरी ते खूश होतात व आपली ओबीसी वोटबँक मराठा-ब्राह्मणांच्या पदारात ‘दान’ म्हणून टाकून देतात. अशा वेळी सर्वसामान्य ओबीसी जनतेने पुढे यावे व आपले आरक्षण वाचवावे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी याचिकाकर्त्यांनी एक संस्था रजिस्टर केली असून बँकेत सामायिक खाते निर्माण केले आहे. ओबीसी बहिण-भावांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या स्वकष्टार्जित कमाईतून
आपापल्या क्षमतेनुसार या अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत. आपला एक रूपयासुद्धा चळवळीला स्फुर्ती देणारा ठरणार आहे. बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे- बँकेचे नावः ऍक्सिस बँक, शाखाः वानवडी पुणे, खात्याचे नावः ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन, अकाऊंट नंबरः 92 00 100 701 22 932, आयएफएस कोडः UTIB 00 00 110, या खात्यात पैसे जमा करून माझ्या पुढील मोबाईल नंबरच्या व्हाट्सपवर पैसे पाठविल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा ही विनंती. तो पर्यंत सत्य की जय हो!....... (लेखनः 11 डिसेंबर प्रकाशनः 13डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this Article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/134-bahujannama-obcbachav-13dec20.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/134-bahujannama-obc-bachav-13dec20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

Sunday, December 6, 2020

133 BahujanNama ThamBhumika 6Dec20 Lokmanthan

बहुजननामा-133 ************** प्रा. श्रावण देवरे योग्य व ठाम भुमिकेची दुसरी आघाडी! -1- योग्य भुमिका व ठाम भुमिका नसेल तर, तुमची कोणतीही कृती वा आंदोलन हे शत्रूच्या फायद्यात जाऊन पडते. अज्ञानातून योग्य भुमिका न घेणे समजू शकतो, परंतू वारंवार सूचना देऊनही व माहिती असनही काही लोक जाणूनबूजून चुकीची भुमिका घेत असतील तर, त्यात शत्रूचे षडयंत्र आहे, हे स्पष्ट होते. एक-दोन ताजी उदाहरणे दिलीत तर स्पष्ट होईल परवा पुण्यात ओबीसींचा मोर्चा झाला. हा मोर्चा लाखोंचा झाला असता, परंतू, काही मुर्ख लोकांनी या मोर्च्यात अचानक शरद पवारांचा फोटो मिरवायला सुरूवात केली आणी स्वाभिमानी असलेल्या ओबीसींनी मोर्च्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे लाखांचा मोर्चा हजारातच निघाला. मोर्चा ओबीसींचा आणी फोटो मराठ्याचा असेल तर आपण किती हीन पातळीवरचे गुलाम आहोत, याची कल्पना येते. राज्य मागास आयोगाचे गठण करतांना फडणवीसांनी असेच ‘पेशवा-षडयंत्र’ यशस्वी केले. आयोग ओबीसी जातींसाठी, मात्र आयोगाचा अध्यक्ष व सदस्य मराठा जातीचे! याच धर्तीवरचे ‘मराठा-षडयंत्र’ पुण्यात यशस्वी करण्यात आले. ओबीसी नेता म्हणून एकवेळ भुजबळ मान्य होतील, पण शरद पवार ओबीसी नेता होऊच शकत नाहीत. ते उघडपणे स्वतःला ‘मराठा-नेता’च म्हणवतात. बरे, हा मराठा नेता ओबीसींच्या हिताचं काही काम करीत असेल तर, त्याचे नेतृत्व एक वेळ मान्य होईल. राजवंशात जन्मलेले क्षत्रिय व्ही.पी. सिंग यांना ‘ओबीसीचे मसिहा’ मानले जाते, कारण त्यांनी मंडल आयोग अमलबजावणीसाठी प्रधानमंत्रीपदाला लाथ मारली. मात्र ओबीसींचे शत्रू म्हणूनच शरद पवार कार्य करीत असतील आणी तरीही पवारांचा फोटो ओबीसी मोर्च्यात मिरविला जात असेल तर हे शत्रूचे षडयंत्र होते व ते यशस्वी झाले, असे समजायचे का?
दुसरे एक उदाहरण चंद्रपूरच्या मोर्च्याचे! हा मोर्चा लाखांच्या घरात निघाला, त्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र मोर्च्याची भुमिका योग्य व ठाम नसेल तर, शत्रूचे फावते. या मोर्च्याची सुरूवातीची माहितीपत्रके वाचली. त्यात ओबीसी जनगणनेचा मुद्दा होता. मात्र ओबीसी जनगणना जर होतच नसेल, आणी ती होणारच नाही, हे स्पष्टपणे केंद्र सरकार सांगत असेल तर, ओबीसींनी पुढे काय केले पाहिजे, हे माहिती पत्रकात सांगणे आवश्यक होते. दुसरे सर्वात मोठे संकट ओबीसींवर येऊ घातले आहे, ते मराठा ओबीसीकरणाचे! या संकटामुळे खर्‍या ओबीसींचे आरक्षणच खतम होत आहे. एवढे मोठे संकट ओबीसींच्या डोक्यावर टांगले जात असतांना मोर्च्याच्या माहितीपत्रकात मराठा ओबीसीकरणाबाबत एक चकार शब्दसुद्धा नाही. मोर्च्याचे संयोजक कदाचित विसरले असतील म्हणून मी फेसबुकवर एक पोस्ट टाकून व काही लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करून या दोन मुद्यांची आठवण करून दिली. पोस्टमध्ये व प्रत्यक्ष चर्चेत मी पहिला मुद्दा स्पष्ट करतांना लिहीले की, ओबीसी जनगणना होऊच शकत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, म्हणून तुम्हाला जनगननेवर बहिष्कार टाकण्याची भुमिका घ्यावीच लागेल. ‘‘ओबीसी कॉलम नाही, म्हणून आमचा जनगणनेवर बहिष्कार’’ असा मजकूर असलेली पाटी घरावर लावा, असा मुद्दा माहितीपत्रकात प्राधान्याने असणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे मराठा ओबीसीकरणाला कडाडून विरोध प्राधान्याने माहितीपत्रकात हवा होता, तो कुठेही दिसला नाही, ना पत्रकात.... ना भाषणांमध्ये! -2- ओबीसींच्या शत्रूंबद्दल नेतेच जर बोटचेपी भुमिका घेत असतील तर, ओबीसी आरक्षण नष्ट झाल्यातच जमा आहे. ओबीसी मोर्च्याच्या माहितीपत्रकात मराठा ओबीसीकरणाविरोधात ठाम भुमिका प्राधान्याने असती, तर या मोर्च्याचे स्वागत करणारे पुरूषोत्तम खेडेकरांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड लावण्याची हिम्मत कोणी केली नसती. तुमचे शत्रू जेव्हा तुमचे स्वागत करतात, तुमचे अभिनंदन करतात; तेव्हा समजून घ्यावे की, ‘तुमची भुमिका शत्रूच्या हिताची आहे व ओबीसींसाठी मारक आहे.’ ओबीसी मोर्च्यात योग्य व ठाम भुमिका न घेणे म्हणजे ‘कणाहिन’ असणे असे नव्हे, तर ओबीसींच्या शत्रूंना मदत करण्याची भुमिका घेणे होय! ते कसे.... ते समजून घ्या पुढीलप्रमाणे- उद्या समजा जर सुप्रिम कोर्टात ओबीसींची बाजू मांडणार्‍या वकीलांनी असा युक्तीवाद केला, की, ‘‘महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ओबीसी संघटना व ओबीसी नेते मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला कडाडून विरोध करीत आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध डावलून जर मराठा ओबीसीकरणाला मंजूरी दिली तर राज्यात मोठा संताप उफाळून येईल व राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल’’ असा युक्तीवाद ओबीसींचा वकील करीत असतांनाच मराठ्यांचे वकील चंद्रपूरच्या या मोर्च्याचे माहितीपत्रक कोर्टात सादर करून युक्तीवाद करतील की, ‘‘हे बघा, चंद्रपूरच्या लाखो ओबीसी मोर्चेकर्‍यांनी मराठा ओबीसीकरणाला कुठेही विरोध केलेला नाही.’’ काही हुशार लोकांना असे वाटते कि, ओबीसी नेते हे भोळे-भाबळे आहेत, चंद्रपूरच्या ओबीसी मोर्च्याच्या आड आपण केलेले हे ‘‘मराठा-षडयंत्र’’ ओबीसींच्या लक्षात येणारच नाही. असे मराठ्यांना वाटणे स्वाभाविक आहे, कारण ओबीसी-नेते आहेतच एक नंबरचे बयाळ! परंतू, हा धोका जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी अनेक लोकांशी चर्चा केली व कोर्टात संभाव्यपणे केले जाणारे हे ‘मराठा-षडयंत्र’ कसे हाणून पाडायचे, याचीही पर्यायी व्यवस्था मी तयार करून ठेवलेली आहे. योग्य व ठाम भुमिका नसेल तर आपणच आपल्या पायावर शत्रूची कुर्‍हाड कशी पाडून घेतो, याची ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत. रस्त्यावरची आंदोलने केलीच पाहिजेत, मात्र या आंदोलनांना योग्य व ठाम भुमिका नसेल तर आपण भरकटत जातो. ईव्हीएमविरोधातील आंदोलनाचे तेच झाले! भाजपाच्या विजयाचे खापर आपण ईव्हीएमवर फोडून मोकळे झालोत. मात्र ते खरे नव्हते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ईव्हीएमचा गैरवापर करून आपला शत्रू सतत जिंकत असेल तर त्यामागे शत्रूपक्षाची कोणती तरी वैचारिक ‘भुमिका’ काम करते आहे. ही भुमिका कोणती व तीला कसा शह देता येईल, याचे कोणतेही उत्तर ईव्हीएमविरोधकांना देता आलेले नाही. ईव्हीएमच्या गैरवापराचे तांत्रिक रहस्य उघड करण्यासाठी मशिनला खोलता येईल. असा प्रयत्न अनेक तंत्रज्ञांनी करून पाहिला आहे. मात्र ईव्हीएमच्या गैरवापराचे रहस्य ‘भुमिकेत’ही आहे, याचे भान कोणालाच नाही, त्यामुळे ‘योग्य व ठाम भुमिकेअभावी’ ईव्हीएमविरोधी लढाई जिंकली जावू शकत नाही. मी या विषयावर हिंदीतून
‘‘ईव्हीएम-2019’’ या नावाची छोटी पुस्तिका लिहीली आहे. -3- नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकात ईव्हीएम नव्हते, बॅलेट पेपर होते. शत्रू पक्षासाठी ही लिटमस टेस्ट होती. या लिटमस टेस्टमधून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की, लोकांसमोर दोनच पर्याय आहेत! एकदा कॉंग्रेस, एकदा भाजपा! तिसरा पर्याय लोक अजूनही शोधत नाहीत. तिसरा पर्याय हा केवळ नंबरवाला पर्याय नव्हे तर, भुमिकेवाला पर्याय आहे. त्यामुळे त्याला तीन नंबर न देता दोन नंबरने ओळखले पाहिजे. कॉंग्रेस व भाजपा हे एकमेकाला केवळ पक्ष म्हणून पर्याय असू शकतात, भुमिका म्हणून नाही. कॉंग्रेस व भाजपाच्या आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, जातीय आदि क्षेत्रातील वैचारिक व तात्विक भुमिका जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपा या दोन वेगळ्या राजकीय आघाड्या दिसत असतील तरी त्यांचे वेगळेपण फसवे आहे. ती एकच आघाडी आहे व तीचे नियंत्रक, संयोजक, संघटक व चालक वगैरे असलेले पडद्यामागील लोक एकच आहेत. कोण आहेत हे कॉंग्रेस+भाजपाच्या पहिल्या आघाडीचे पडद्यामागील चालक, संयोजक, नियंत्रक? त्यांची विचारसरणी कोणती, तत्वज्ञान कोणते, ध्येय-धोरण काय व त्यांना या देशात नेमके काय हवे आहे? या सर्व प्रश्नांवर आम्ही वारंवार लिहीत असतो, बोलत असतो व तसे जनजागृतीचे कार्यक्रमही घेत असतो. मात्र अजूनही आमच्या शिक्षित असलेल्या पदवीधारकांना व प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांना ‘‘योग्य व ठाम भुमिका’’ म्हणजे काय हेच माहित नाही. निवडणूकात एकदा ‘याला’ व एकदा ‘त्याला’ आलटून-पालटून निवडून आणायचे असते, एव्हढेच त्यांना माहिती आहे. या आलटून पालटून मध्येही ‘जाती’ मात्र बदलत नाहीत. एकदा ब्राह्मणवादी भाजपाचा ब्राह्मण निवडूण आणायचा व दुसर्‍यांदा ब्राह्मणवादी कॉंग्रेसचा मराठा निवडून आणायचा, यालाच आलटून-पालटून म्हणायचे. कधीतरी कॉंग्रेस-भाजपातर्फे ओबीसी निवडून आला तर त्याला ‘क्रांतिकारी परिवर्तन’ म्हणायचे का? ब्राह्मणवादी ब्राह्मण व ब्राह्मणवादी मराठा यांच्या व्यतिरिक्त ‘अब्राह्मणवादी मागास’ उमेदवारही निवडणूकीला उभे आहेत, याचा कुणी विचारही करायला तयार नाही. त्यामुळे भुमिका घेऊन पर्याय उभा करणे हे फार मोठे काम आहे व ते लांब पल्ल्याचे आहे. ते सतत करीत राहणे, हाच एकमेव मार्ग आहे. केव्हा तरी यश येईल, एवढे मात्र निश्चित! तो पर्यंत सत्य की जय हो!.......  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/133-bahujannama-thambhumika-6dec20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 29, 2020

132 BahujanNama Elect Candidate 29Nov20

बहुजननामा-132 ************** प्रा. श्रावण देवरे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील सत्यजित, बंडगर, पांचाळ व खोब्रागडे यांची ‘भुमिका’ विजयी करा! -1- महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ व पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून 1 डिसेंबरला ‘मतदेण’ संपन्न होणार आहे. मागील आठवड्यात आम्ही जाहिर केले होते की, Obc+Sc+St+Ntvj+Dnt+Sbc+Muslim Obc या प्रवर्गांच्या संयुक्त आरक्षण मंचातर्फे ‘फुलेशाहूआंबेडकरवादी’ जी भुमिका जाहीर केली आहे, तीच भुमिका घेऊन जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना पाठींबा देण्याचा आम्ही विचार करू. भुमिकेतील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत- 1) OBC,SC,ST,VJ/NT SBC व मुस्लीम ओबीसी या संवैधानिक प्रवर्गात मराठा जातीसारखी कोणतीही उच्चजातीय घुसखोरी सहन केली जाणार नाही. 2) शैक्षणिक अभ्यासक्रमात फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचे धडे व पुस्तके समाविष्ट करायला सरकारला भाग पाडणार 3) शिक्षणक्षेत्रातील सरंजामशाही व ब्राह्मणशाहीविरोधात सतत संघर्ष करणार 4) असंख्य पद्वीधर मुले कर्ज काढून MPSC व UPSC परीक्षांची तयारी करीत असतांना महाराष्ट्र शासनाने या परीक्षा अचानक पुढे ढकलल्यात. या सर्व परीक्षार्थिंना नुकसानभरपाई म्हणून किमान 1 लाख रूपये देण्यात यावेत व लवकरातलवकर परीक्षांचे आयोजन करावे. 5) थांबवलेली नोकरभरती त्वरीत सुरू करून पद्वीधर बेरोजगारांना लवकरात लवकर नोकरीत समावून घ्यावे. 6) ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिकाधिक कडक करून या ऍक्टचे संरक्षण ओबीसीमधील बलुतेदार जातींनाही मिळाले पाहिजे. त्यासाठी या ऍक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी 7) जात-पोटजातनिहाय जनगणना करायला लावून आरक्षणाची वर्गवारी लोकसंख्येनुसार करायला सरकारला भाग पाडणार. 8) जात-पोटजातनिहाय जनगणना केल्यानंतर त्यातील आकडेवारीच्या आधारे सर्व मागास कॅटेगिरीतील अतिअल्पसंख्य जातींसाठी आरक्षणाचे विभाजन करायला सरकारला भाग पाडणार. 9) निती आयोग बरखास्त करून प्लॅनिग कमिशनचे पुनर्गठण करणे व संवैधानिक आरक्षणाच्या प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद केली पाहिजे असे काही महत्वाचे मुद्दे घेउन ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. ही भुमिका जाहीर केल्यानंतर या भुमिकेला बर्‍याच मतदार-कार्यकर्त्यांनी फोन करून पाठींबा दिला. आपण उमेदवारांची नावे जाहीर करा, त्याप्रमाणे आम्ही मतदान करू, असेही त्यांनी सांगीतले. पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत जानराव, पुणे पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव बंडगर, औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार नागोराव पांचाळ व नागपूर मतदारसंघातील उमेदवार अतूल खोब्रागडे यांनी संपर्क केला व आपण मांडलेली भुमिका घेऊनच आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत, असे सांगीतले. त्याप्रमाणे पुणे येथे 25 नोव्हेंबर 20 रोजी जाहीर कार्यक्रम घेऊन या उमेदवारांनी आपली भुमिका जाहिर केली व प्रचारयंत्रणा सुरू झाली. -2- गेल्या 10 वर्षात ओबीसी कॅटेगिरीत राजकीय व सामाजिक जागृती वाढलेली आहे. त्यामुळे ब्राह्मण-मराठ्यांसारखे प्रस्थापित शोषक असलेले जात-सनेते भयभीत होणे स्वाभाविक आहे. कनिष्ठ मागास जातीतील जागृती विकाऊ असते, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. एखाद्या मतदारसंघात एखादा शोषित-पिडित समाजघटक संख्येने जास्त असेल तर त्यांचाच प्रतिनिधी निवडूण येण्याची खात्रीही असते. असे अनेक मतदारसंघ आहेत, ज्यात तेली, माळी, धनगर, बौद्ध यापैकी एका-एका जातीची लोकसंख्या निम्म्यापेक्षाही जास्त आहे. अशावेळी अल्पसंख्य असलेला ब्राह्मण-मराठा नेता असेकाही षडयंत्र रचतो की जेणेकरून उच्चजातीय उमेदवार अल्पसंख्य असूनही सहजपणे निवडून येतो. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना समजतच नाही. उदाहरण पुढीलप्रमाणे- 2019 च्या नागपूर लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्य जातीचे नितीन गडकरी भाजपातर्फे उभे होते. या मतदारसंघात बौद्धांची संख्या जास्त आहे. नितीन गडकरी यांची इमेज अशी आहे की ते जणू संघ-भाजपाचे ‘नाक’ आहेत. संघ-भाजपाचे हे नाक कापण्याची फार मोठी संधी यावेळी बौद्धांच्या हातात होती. मात्र शत्रूचे नाक कापण्याऐवजी आपले स्वतःचेच नाक कापून घेण्यात आमच्या काही आंबेडकरवाद्यांना मजा वाटते. या निवडणूकीत 18 बौद्ध उमेदवार उभे राहीलेत. त्यामुळे बहुसंख्य असलेली आंबेडकरी मते विभागली गेलीत व अल्पसंख्य असलेले नितीन गडकरी सहजपणे जिंकून आलेत. 18 बौद्ध उमेदवार एकाच मतदारसंघात उभे करण्याचे षडयंत्र गडकरींचेच होते, हे वेगळे सागण्याची गरज नाही. शत्रूचे षडयंत्र यशस्वी करण्यात बौद्ध इतके पुढे आहेत, तर मग ओबीसींनी का म्हणून मागे राहावे? शिक्षक व पद्वीधर मतदारसंघात 50-50 पेक्षाही जास्त उमेदवार उभे आहेत. कोण आहेत हे बहुसंख्य उमेदवार? हे ओबीसी व दलित उमेदवार आहेत. या उमेदवारांमध्ये ओबीसी-दलित चळवळीशी संबंध नसलेले अनेक हौसे-नौसे-गौसे आहेत. कोणी उभे केले या हौस्या-गौस्यांना? अर्थातच प्रस्थापीत मराठा समाजाच्या नेत्यांनी अक्षरशः पैसे देऊन हे उमेदवार केले आहेत. जे षडयंत्र नितीन गडकरींनी नागपूर लोकसभा निवडणूकीत यशस्वी केले, तेच षडयंत्र शिक्षक व पद्वीधर निवडणूकीत मराठा उमेदवार करीत आहेत. मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या जागृत राज्यकर्तावर्ग असल्याने अनेक मराठा उमेदवारांमधून ‘नेमका’ मराठा उमेदवार कोण व त्यालाच कसे निवडून आणले पाहिजे, याचे प्रशिक्षण मराठा समाजाला देण्याची गरज नाही, कारण प्रदिर्घ काळातील सत्तेतून हे शहाणपण सहजपणे येत असते. असे शहाणपण ओबीसी व दलितांकडे नाही. त्यांची राजकीय जागृती आजही जातीतच अडकलेली आहे. ‘राज्यकर्ता वर्ग’ बनण्याची फिलॉसॉफिकल क्षमता त्यांच्यात अजून आलेली नाही. त्यामुळे 5-25 हजार रूपयात ते आपल्या जातीला सहजपणे विकून टाकतात व त्याबद्दल त्यांना कुठेही लाज-लज्जा वाटत नाही. आताही या निवडणूकांमध्ये प्रस्थापित मराठा नेत्यांकडून 5-25 हजार रूपये घेऊन ओबीसी व दलित जातीतील काही उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. ते वेगवेगळ्या जातींचे असल्याने त्यांना त्यांच्या जातीची मते मिळतील व मतांची विभागणी होऊन एकमेकात पाय अडकवून पडतील. आपण पराभूत झालोत तर आपल्या समाजाचे ‘नाक’ कापले जाईल, याचीही त्यांना पर्वा नसते. 5-25 हजार रूपये मिळालेत, यातच त्यांना आनंद वाटत असतो. पैसे खाऊन स्वतः घसरतात व समाजालाही ‘आडवे’ पाडतात. अशावेळी ओबीसी-दलित समाजातील मान्यवर नेत्यांनी व विचारवंतांनी उमेदवार निवडणूकीत हस्तक्षेप केला पाहिजे व चळवळीशी कट्टर नाते असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांनाच निवडूण आणण्याचे आवाहन केले पाहिजे. परंतू बरेचसे ओबीसी-दलितेनेते व विचारवंतही प्रस्थापित मराठा-ब्राह्मण जातीशी ‘‘बांधील’’ असल्याने ते असे ‘कार्य’ करू शकत नाहीत. म्हणून आमच्यासारख्या ‘गल्ली-बोळात’ काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी हे काम शिरावर घेतले आहे. आम्ही गेल्या आठवड्यात निवडणूकीची तात्विक भुमिका जाहिर केली व या भुमिकेला जाहीरपणे मान्यता देणार्‍या चार उमेदवारांची नावे प्रथम पसंतीची म्हणून घोषित करीत आहोत. हे चारही उमेदवार दलित-ओबीसी चळवळीत काम करणारे आहेत व ‘भुमिका’ घेऊन उभे आहेत. -3- ओबीसी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रदिप ढोबळे यांनी ‘मतदेण’ प्रक्रियेत भाग घेतांना एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. ती मी सर्व सोशल मिडियावर व्हायरल केलेली आहे. त्याप्रमाणे पुणे शिक्षक मतदारसंघातील सत्यजित जानराव यांना पहिल्या पसंतीचं ‘मतदेण’ करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर डॉ. राजेंद्र कुंभार यांना दुसर्‍या पसंतीचं मतदेण करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 2 असा आकडा लिहावा. रविंद्र सोलंकर यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेन करतांना 3 असा आकडा लिहा. सुरेश नारायण वाघमारे यांना चौथ्या क्रमाकाचे मत द्या! पुणे पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदेण करतांना शिवाजीराव बंडगर यांना पहिल्या पसंतीचं मत द्या व त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर सोमनाथ जनार्दन साळूंखे यांच्या नावासमोर 2 असा आकडा इंग्रजीत लिहा. औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील प्रा. नागोराव पांचाळ यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. त्यानंतर सचिन अशोक निकम यांना दुसर्‍या पसंतीचं व शेख सलीम शेख इब्राहिम यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेण करा. नागपूर पद्वीधर मतदारसंघातील अतूल खोब्रागडे यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. वरीलपैकी प्रत्येक उमेदवाराने स्वतःसाठी प्रथम पसंतीचं मत मागावे व आपल्या वैचारिक जोडीदार उमेदवारांसाठी दुसर्‍या, तिसर्‍या क्रमांकाची मते मागायची आहेत. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा व मनसे या पाच पक्षांच्या उमेदवारांना मते देऊ नका. या पक्षांच्या उमेदवारांच्या नावापुढे कोरी जागा ठेवावी, तेथे काहीही लिहू नये. कारण या पक्षातर्फे निवडून गेलेले आमदार-खासदार हे ओबीसी-दलितांचे शत्रू म्हणूनच काम करतात. हे उमेदवार आपल्या दलित-ओबीसींच्या मोर्च्यात-मेळाव्यात येऊन क्रांतिकारक भाषणे करून टाळ्या मिळवितात, मात्र विधानसभेत-लोकसभेत गेल्यावर मराठा-ब्राह्मणांच्या हिताचेच काम करतात. पक्षांच्या बैठकीत आपल्या उच्चजातीय मालकांपुढे दलित-ओबीसींच्या प्रश्नांवर बोलण्याची यांची हिम्मतही होत नाही. त्यामुळे या पाच पक्षांतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार कोणत्याही जातीचे असोत, त्यांचा सपशेल पराभव करा व आम्ही सांगीतल्याप्रमाणे फुलेशाहूआंबेडकरी ‘भुमिका’ स्पष्टपणे घेणार्‍या उपरोक्त चार उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांच्या भुमिकेला विजयी करा. सत्य की जय हो!.......  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article:- 1) https://shrwandeore.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29nov20.html 2) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29-nov.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

Saturday, November 21, 2020

131 BahujanNama election Bhumika 22Nov20 Lokmanthan

बहुजननामा-131 ************** प्रा श्रावण देवरे भुमिका घेऊन ‘उभे’ राहा, म्हणजे समाज ‘आडवा’ होणार नाही!! (महाराष्ट्रात पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून त्याबाबत OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींच्या वैचारिक भुमिकेबद्दल या लेखात चर्चा केली आहे, ती आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहोत. ----- संपादकीय) -1- ‘सहकार हा एक उच्चवर्णियांचा गट आहे.....! लुटके लाओ, बाटके खाओ, हा त्यांचा कट आहे!!’’ ----- माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडेंच्या कवीतेतील दोन ओळी
डॉ. नारायणराव मुंडे उपाख्य दादा यांच्याशी चर्चा करीत असतांना त्यांनी एक अनुभव शेअर केला. त्यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील एक मित्र आमदार होते. ते ओबीसीमधील अतिअल्पसंख्यांक जातीतील होते. पवारसाहेबांचे पाठीराखे असल्यामुळे त्यांनी एक साखर कारखाना मिळविला. कारखान्याची परवानगी मिळविणे वेगळे आणी तो उभा करून चालवून दाखविणे वेगळे. प्रस्थापित व सत्ताधारी जातींसाठी ते फारसे कठीण नसते. हे आमदार महाशय अतिअल्पसंख्यांक व त्यात पुन्हा शूद्ध ओबीसी होते! जेथे तेली, माळी सारख्या बहुसंख्य (मोठ्या) ओबीसी जातीतील आमदार कारखाना काढण्याची हिम्मत करीत नाही, तेथे ओबीसीमधील अतिअल्पसंख्य असलेल्या नाभिक, धोबी, विणकर, कोष्टी जातीच्या आमदाराने कारखाना उभा करून चालवून दाखविला, हे खूप मोठे ‘जातीय आश्चर्यच’ म्हणावे लागेल. अर्थात याचे श्रेय त्या ओबीसी आमदारालाच दिले पाहिजे कारण त्यांनी अत्यंत चिकाटीने व सर्वस्व पणाला लावून कसाबसा कारखाना उभा केला व व्यवस्थीत चालूही केला. कारखान्याचे सभासद नोंद करतांना किमान 40 टक्के सभासद ओबीसी व दलित असतील याचीही काळजी त्यांनी घेतली. डॉ. नारायणराव मुंडेंच्या त्या ओबीसी-आमदार मित्राने सर्वस्व पणाला लावून 20-25 वर्षात कसाबसा कारखाना उभा केला आणी सुरू झाल्यावर एका वर्षाच्या आत कारखान्याच्या निवडणूका लागल्यात. त्या निवडणूकीत डॉ. मुंडे यांना मित्र म्हणून प्रचारासाठी बोलावले. पहिल्याच प्रचारसभेत डॉक्टरांनी ओबीसी चळवळ, दलित चळवळ, फुलेआंबेडकर सांगीतला व अतिअल्पसंख्य ओबीसी आमदाराच्या धारिष्ट्याचे कौतूकही केले. अशा जिगरबाज नेत्यालाच कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून द्या, असे आवाहनही डॉ. मुंडे यांनी केले. डॉ. मुंडेंच्या भाषणाने आमदारसाहेब अस्वस्थ झालेत. कसाबसा कार्यक्रम आटोपता घेऊन आमदार गाडीत बसले व डॉक्टरांनाही गाडीत बसण्यास सांगीतले. गाडी गावाबाहेर आल्यावर आमदार डॉ. मुंडेंना म्हणाले, ‘‘अहो! मुंडेदादा, ही बाबासाहेबांच्या जयंतीची सभा नव्हती! माझ्या कारखान्याच्या निवडणूकीची सभा होती. तुम्ही भाषणात ओबीसी-ओबीसी केले, तर सर्व पॅनलमधील प्रस्थापित मराठे एकत्र होतील व मला पराभूत करतील.’’ दादा हसले आणी ईशारा देत म्हणाले, ‘‘तुम्ही जर आपल्या लोकांना फुलेआंबेडकर सांगीतला नाही व चळवळही सांगीतली नाही, तर एक दिवस तुमचा कारखाना तुमच्या हातातून निघून जाईल व तुम्हाला कारखान्याच्या गेटवर जायलासुद्धा अपमान वाटेल.’’ दादासाहेब डॉ. नारायणराव मुंडेंनी दिलेला हा ईशारा लगेच खरा ठरला. आज हा कारखाना मराठ्यांच्या ताब्यात आहे व कारखान्याचे संस्थापक असलेले आमचे ओबीसी आमदार कारखान्याकडे फिरायला जाण्याचीही हिम्मत करीत नाहीत. -2- हे उदाहरण द्यायचे कारण असे की, निवडणूका या गल्लीतल्या असो की दिल्लीतल्या! प्रस्थापित क्षत्रिय(?) जातीच्या विरोधात बोलण्याची हिम्मत ना ओबीसी नेत्यांमध्ये असते, ना दलित नेत्यांमध्ये! त्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षात गुलामगिरीशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही. एरवी हे ओबीसी-दलित नेते प्रस्थापित जातींच्या विरोधात खाजगीत भरपूर बोलतील, 25-30 हजार रुपये मानधन घेऊन दलित-ओबीसी-भटके विचारवंत क्रांतिकारक भाषणे करतील. मात्र ऐन मोक्याच्या वेळी, निवडणूकांच्या काळात यांची अक्कल गहाण पडते. आता ताजे उदाहरण म्हणून विधान परीषदेच्या जाहिर झालेल्या पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे बघा! OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींची 9 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रीय मागासवर्गीय आरक्षण गोलमेज परिषद (पहीली) संपन्न झाल्यानंतर, नंतरच्या परीषदा या निवडणूका जाहिर झालेल्या मतदारसंघात झाल्या पाहिजेत, जेणे करून तेथील ओबीसी, एस्सी उमेदवाराला त्या परीषदेचा लाभ होईल, या उद्देशाने आम्ही अनेक ईच्छुक उमेदवारांना ही दुसरी परीषद घेण्यासाठी आग्रह केला. मात्र बर्‍याचजणांचा अशी भुमिका घेऊन निवडणूका लढण्यास विरोध होता. निवडणूकांच्या काळात प्रस्थापित जातींना उघडपणे विरोध केला, तर त्यांची मते मिळणार नाहीत व ते नाराज होतील. काही उमेदवार म्हणाले की, ‘‘आमचे बरेचसे मित्र मराठा आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांना आम्ही नाराज करू ईच्छित नाहीत.’’ आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला की, ‘‘हे तुमचे प्रस्थापित मित्र जेव्हा मराठा ओबीसीकरणाची भुमिका मांडतात, तेव्हा त्यांना तुमच्यासारख्या ओबीसी मित्रांच्या नाराज होण्याची भिती का वाटत नाही?’’ अर्थात हे सत्य आहे की, या प्रस्थापित जातींना दलित-ओबीसी मित्र नाराज होण्याची भिती अजिबात वाटत नाही, कारण या दलित-ओबीसी मित्रांची लाचारी ते गृहित धरूनच असतात. खरे म्हणजे ते एकमेकांचे मित्र नसतातच! मैत्रीच्या नावाने त्यांच्यात गुलाम-मालकाचेच नाते असते. असेच लाचार मैत्रीचे नाते ब्राह्मणांसोबतही असते. असे लाचार ओबीसी-दलित उमेदवार निवडूनभी आलेत तरी ते प्रस्थापितांच्या वाड्यावर पाणी भरण्याचेच काम करतात, याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मराठा ओबीसीकरणाचे विधेयक मंजूर होतांना अनुभवला. त्या काळात (म्हणजे 15 नोव्हेंबर 2018 ते 29 नोव्हेंबर 2018 या 15 दिवसात) आम्ही विधानसभेच्या व विधानपरीषदेच्या बर्‍याच दलित-आदिवासी-ओबीसी आमदारांना भेटलो व मराठा ओबीसीकरणाच्या विधयेकाच्या बाजूने मतदान करू नका, असे पटवून दिले. बर्‍याच आमदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, निवेदनं दिलीत, टिव्हीवरून, प्रिंट मिडियावरून वारंवार आवाहन केले, आझाद मैदानावर आंदोलने केलीत. मात्र एवढे सर्व परिश्रम घेऊनही या सर्व दलित-ओबीसी-आदिवासी-भटक्याविमुक्त आमदारांनी 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा ओबीसीकरण करणार्‍या विधेयकाला एकमताने ‘‘जल्लोषात’’ मतदान केले व सच्च्या ओबीसी जातींच्या आरक्षणावर मरणाचा घाव घातला. ज्या जातीत आपला जन्म झाला, त्या जातीबद्दल यांना अजिबात चाड नाही. वैचारिक भुमिका न घेणारे कणाहीन ओबीसी नेते नेहमीच प्रस्थापित जातींसाठी ‘‘उभे’’ राहतात व आपल्या स्वतःच्या समाजाला ‘‘आडवा’’ पाडून खड्ड्यात घालतात. आता पद्वीधर व शिक्षक मतदारसंघातून एखादा ओबीसी वा दलित उमेदवार आमदार म्हणून निवडून आला, तर तो विधान परिषदेत जाऊन ओबीसींना खड्ड्यात घालण्याचेच काम करणार आहे. कारण
त्यांचे प्रस्थापित जातीतील मित्र नाराज होणार नाहीत, याची ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतात. शिक्षक मतदारसंघातील काही उमेदवार शिक्षणव्यवस्थेवर डझनभर भाषणे देत आहेत. परंतू शिक्षणव्यवस्थेतील जातीव्यवस्थेवर ते बोलणार नाहीत, कारण त्यांचे ब्राह्मण-मराठा मित्र नाराज होतील, अशी त्यांना भिती वाटते. असे शिक्षणतज्ञ लोक आमदार झाल्यावर प्रस्थापितांच्या वाड्यावर जाऊन मुजरा घालण्याचेच काम करतात. जोपर्यंत शिक्षणव्यवस्थेतील जातीयवाद नष्ट होणार नाही, तो पर्यंत शिक्षणाचे तत्वज्ञान कुचकामीच राहणार आहे. जो पर्यंत शिक्षणव्यवस्था शाहूराजे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव विचारे यासारख्या सत्यशोधकांच्या ताब्यात होती, तो पर्यंत शाळा-कॉलेजात अब्राह्मणी विचारसरणी जाणीवपूर्वक शिकविली जात होती. मात्र नंतर याच संस्था सरंजामदारांच्या ताब्यात गेल्यावर ते शिक्षणसम्राट बनलेत. या शिक्षणसम्राटांचे ‘गुरू’ सत्यशोधक न राहता ब्राह्मण-भटजी झालेत. परिणामी त्यांच्या शाळा-कॉलेजात शिवजयंतीऐवजी ‘‘गणपती-उत्सव’’ साजरे व्हायला लागलेत. शिक्षणक्षेत्रातील या सरंजामशाहीविरोधात व ब्राह्मणशाहीविरोधात बोलण्याची हिम्मत ज्या उमेदवारांमध्ये आहे, असे उमेदवार आम्ही शोधत आहोत. MPSC परीक्षा व नोकरभरती बंद पाडून लाखो पद्वीधारकांना नोकरीपासून वंचित करणार्‍या लोकांना धडा शिकविण्याची हिम्मत ज्या पद्वीधर उमेदवारामध्ये आहे, असाच उमेदवार आम्ही शोधतो आहोत. त्यासाठी दिलेला कृती-कार्यक्रम ‘‘भुमिका’’ म्हणून ज्यांना मान्य असेल, ते आमचे सच्चे मित्र असतील. पद्वीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातून उभे असलेले जे उमेदवार स्पष्टपणे सरंजामशाही व ब्राह्मशाहीच्याविरोधात भुमिका घेतील, त्यापैकी एक-एक सक्षम उमेदवार आम्ही जाहिर करणार आहोत. आम्ही समस्त संवैधानिक आरक्षणवादी (OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc) मतदारांना आवाहन करतो की, आम्ही जाहीर करीत असलेल्या दोन उमेदवारांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. ही दोन नावे कोणती, याबद्दलचे निवेदन आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तो पर्यंत, जयजोती, जयभीम, इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो! (लेखनः 19 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन, 22 नोव्हेंबर 2020------- -- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 Links for this Article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/131-bahujannama-election-bhumika-22nov.html 2) Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/ ई मेलः- s.deore2012@gmail.com

Saturday, November 14, 2020

130 Bahujannama Divali 15Nov20 Lokmanthan

बहुजननामा-130 दिवाळीः हिंदूंची व वैदिकांची!! आमच्या आजच्या सांस्कृतिक संघर्षाचे प्रेरणास्थान असलेले दोन राजे आहेत. एक ‘महासम्राट बळीराजा’ व दुसरा ‘छत्रपती शिवाजी राजा’! या दोघांचा सांस्कृतिक संघर्ष प्रा. श्रावण देवरे यांनी एका पुस्तकाद्वारे मांडलेला आहे. हे पुस्तक तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या स्मृतीदिनी 28 नोव्हेंबर 2020 रोजी ‘अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे’ त्यांच्या पहिल्या अधिवेशनात प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण बलीप्रतिपदेच्या निमित्ताने आपल्या वाचकांसाठी देत आहोत----- संपादकीय -1- हिंदू कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी बलीप्रतिपदा दाखविलेली असते. दिवाळीच्या पूर्ण आठवड्यात आपण गायगोरस-बारस, धनतेरस म्हणजे धनाच्या लक्ष्मीच्या पूजेचा दिवस साजरा करतो. नरक चतुर्थी व दिवाळीही साजरी करतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी येणारा भाऊबीजेचा दिवसही साजरा करतो. मात्र ज्याच्या बलीदानाने हे सर्व घडले त्या बळीराजाची बलीप्रतिपदा मात्र साजरी करीत नाहीत.
भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी-दसर्‍याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणतात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. पाच हजार वर्षांनंतरही बळीच्या राज्याची मागणी होत आहे. आजही शेतकर्‍याला बळीराजा म्हटले जाते. तसेच बळीराजा म्हणजे शेतकर्‍यांचा राजा असे म्हटले जाते. पाच हजार वर्षानंतरही ज्या बळीराजाची आठवण आम्ही आजही करतो, बळीचं राज्य नवखंडांचं! अफगाणीस्थानच्या बलुचीस्थानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे पूर्ण अशिया खंडच समझा! ईशान्येकडील राज्यांना बालेय प्रदेश म्हटले जाते. म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले भारत खंडाला बलीस्थान म्हणतात. पृथ्वीतलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहीला छत्रपतीसुद्धा! कारण पाच हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वात नव्हता. पृथ्वीवर जेथे जेथे मानवी वस्ती होती, ती रानटी अवस्थेतील मानवांचीच होती. भारतात मात्र सहा हजार वर्षांपूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती. आपण चौथ्या इयत्तेतील इतिहासाचं पुस्तक वाचलंच असेल, त्यातील एका पानावर मोहेंजोदडो व हडप्पा या दोन शहरांची चित्रं दिसतात. ही दोन्ही गावे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या भरभराटीची साक्ष देतात! सिंधू नदीच्या खोर्‍यात फुललेली-बहरलेली ही संस्कृती होती. इतिहास काळात कधीतरी जमिनीत गाडली गेलेली. ही शहरे आधुनिक शहरांसारखीच आहेत. बळीराजा हा अशा प्रगत सिंधू संस्कृतीचा वारसदार होय. सिंधू संस्कृतीची संस्थापक निऋति होय. तीने हाताच्या साहाय्याने शेती करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यानंतर बळीच्या राज्यात शेतीचे तंत्र विकसित झाले. बळीराजा हा आपल्या प्रगत शेती तंत्राचा व कृषी संस्कृतीचा प्रचारक होता. नांगराच्या व बैलाच्या साहाय्याने शेती करण्याचे नवे तंत्र बळीराज्यात शोधले गेले. त्यामुळे शेतीचा विस्तार झाला व उत्पादनही शेकडो पटीने वाढले. ज्या ज्या रानटी मानव समुहांनी हे प्रगत तंत्र स्वीकारले त्यांचा विकास झाला. त्यांनी स्वतःहूनच बळीराजाला आपला राजा मानलं. त्यामुळे बळीराजाला राज्याचा विस्तार करण्यासाठी कधीच युद्ध करावं लागलं नाही. बैल या प्राण्याची पूजा ‘नंदी’ म्हणून होऊ लागली. त्याकाळच्या आदिवासी नायक असलेल्या महादेवाने आपले वाहन म्हणून ‘नंदी-बैल’चा स्वीकार केला, कारण बैल हा नव्या क्रांतीचा ‘सहनायक’ होता. आताच्या आशिया खंडाच्या आकाराएवढे बळीचं राज्य! मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन-प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही सरस व कार्यक्षम शासन-प्रशासनव्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. बलीस्थानचे नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसारखे राज्य आहेत, त्याप्रमाणे बळीच्या राज्यातही खंड (राज्य) होते. राज्याचा प्रमूख मुख्यमंत्री, तसा खंडाचा प्रमुख खंडोबा! आजचे आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय! राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलीस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला जोतिबा म्हणायचे! म्हणजे आजचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संजय यादव हे बलीस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या धुळे जिल्ह्याचे जोतीबा होत. आज प्रशासकीय सोयीसाठी तीन चार जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ, आपला नाशिक महसूल विभाग घ्या. धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर व नाशिक अशा पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलीस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्याच्या प्रमुखाला महासुभेदार म्हणत. या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आज आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख (आयुक्त) माननीय राधाकृष्ण गमे हे आपल्या बलीस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. या प्रमाणे बलीस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज जोतीबा, खंडोबा, मल्हार या दैवतांची पुजा करतात. पाच हजार वर्षांपूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बळीराष्ट्र इतके प्रगत होते. याचा आपल्याला अभिमान असला पाहीजे. बळीच्या राज्यात स्त्रियांना समान अधिकार होते. कारण बळीचं राज्य हे विंध्यावली राणीचं मातृवंशसत्ताक राज्य होते. तिने बळीशी लग्न केलं म्हणून बळी या राज्याचा राजा झाला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे आता जगभरचे शास्त्रज्ञ मान्य करतात. भारतखंडात शेतीचा शोध सर्वप्रथम सिंधू नदीच्या खोर्‍यातील स्त्रियांनी लावला. -2- वामनाने बळीराजाचा कपटाने खून केला, तो दिवस होता अश्विन शूद्ध दशमीचा! तेव्हापासून आर्यांनी हा विजयोत्सव ‘दसरा’ म्हणून साजरा करायला सुरूवात केली. दसर्‍याला बळीराजाचा खून झाल्यावर संध्याकाळी बाणासुराने आपल्या प्रजेची कशीबशी समजूत घालीत तीला शांत केलं. आपला बळीराजा आपल्याला 21 दिवसांनी पुन्हा भेटायला येणार आहे, असे सांगून प्रजेच्या मनात बळीराजा परत येईल, अशी आशा जागवली. दसर्‍यापासून तो एकविसावा दिवस म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ होय! आमच्यासारखे काही मूठभर फुलेआंबेडकरवादी गेल्या 20 वर्षांपासून बळीप्रतिपदा साजरी करायला लागलेत. त्याची धास्ती बामनवाद्यांनी घेतली आहे. बामनवाद्यांनी आता बळिप्रतिपदेच्याच दिवशी ‘पहाट-पाडवा’ नावाचा सनातनी कार्यक्रम सुरू केला आहे व आमचे बहुजन म्हणविणारे नगरसेवक-आमदार वगैरे राजकारणी लोक पैसे देऊन या सनातनी कार्यक्रमात समील होत असतात. या बहुजन राजकारण्यांना बलीप्रतिपदा साजरी करायला सांगीतली, तर त्यांची नानी मरते, नालायकांची! अश्विन वद्य दशमीस बळीराजाचा खून केल्यानंतर वामन व त्याच्या सैन्याने राज्यात हाहाःकार माजल्याची संधी साधली व प्रचंड लुटमार केली. ही लूटलेली संपत्ती घेऊन वामन आपल्या घरी परतला,
तेव्हा त्याच्या बायकोने कणकेचा बळीराजा बनवून घराच्या उंबरठ्यावर ठेवला. वामनाने त्या कणकेच्या बळीच्या पोटात पुन्हा तोच सुरा खुपसला व घरात प्रवेश केला. आपल्या नवर्‍याने महापराक्रमी असलेल्या बळीला मारले व संपत्ती लुटून आणली या आनंदाने तीने नवर्‍याला ओवाळले. तेव्हापासून दसर्‍याच्या दिवशी प्रत्येक आर्य-ब्राम्हणांच्या घरात बळीराजाचा खून केला जातो. मात्र बळीराजावर प्रेम करणारी जनता याच दिवशी ‘बळीचे राज्य येऊ दे’ असा आक्रोश करते. या दोन्ही परस्परविरोधी घटना एकाच दिवशी म्हणजे दसर्‍यालाच घडतात. या केवळ दोन विरोधी घटना नाहीत तर, दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे. रणांगणावरच्या युद्धात आर्यलोक कधीच जिंकले नाहीत. मात्र आपण बहुजन नेहमीच इतिहासाच्या पानांवर पराभूत होत असतो. इतिहास निर्माण करीत असतांना तो लेखीस्वरूपात नोंदही करून ठेवायचा असतो. आम्ही शूद्रातिअतिशूद्रातील बुद्धीजीवी पोटभरू आहोत, त्यामुळे आम्ही पोटापुरते लिहीतो व बोलतो. त्याच्याने तुमचे पोट भरत असेल, मात्र तुमच्या पुढच्या अनेक पिढ्या तुम्ही दुःख दारिद्र्याच्या खाईत लोटतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही काहीच लिहीत नाहीत व बोलतही नाहीत. धन्यवाद! इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो! (लेखनः 07 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 08 नोव्हेंबर 2020------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270